Skip links

राष्ट्रग्रंथ’ नाटकाने गव्हर्नमेंट लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची मने जिंकली!

राष्ट्रग्रंथ नाटक

राष्ट्रग्रंथ नाटक

आशियातील सगळ्यात जुन्या व देशातील प्रतिष्ठित ‘शासकीय विधी महाविद्यालय’ चर्चगेट, मुंबई येथे ‘राष्ट्रग्रंथ’ या दोन अंकी मराठी नाटकाचा प्रयोग उत्साहात साजरा झाला. दिनांक २८ फेब्रुवारी २०२५ रोजी महाविद्यालयाच्या नाट्यगृहात ‘आर्टिस्टिक ह्युमन्स’ संस्थेने राष्ट्रग्रंथ या भारतीय संविधान या विषयावर आधारित नाटकाचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या महाविद्यालयाचे प्राचार्यपद भूषवले होते.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य यांच्यासह, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या नाटकाला  उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व या अनोख्या नाट्यकलाकृतीचे कौतुक केले. तसेच सदर नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग व्हावेत यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य यांनी सांगितले.

राष्ट्रग्रंथ नाटकात भारतीय संविधानाची निर्मितीप्रक्रिया, भारतीय लोकशाहीला आकार देणारे महत्वाचे ऐतिहासिक खटले इत्यादी घटनांचा अत्यंत रंजक पद्धतीने पट मांडलेला आहे. नाटकाच्या सादरीकरणानंतर महाविद्यालया तर्फे राष्ट्रग्रंथ नाटकाचे लेखक प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर, दिग्दर्शक – कुमार सोहोनी, वेशभूषाकार – चैत्राली डोंगरे, नाटकाचे निर्माते दर्शन महाजन व कलाकारांचा सत्कार केला.

भारतीय संविधान या अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या विषयावरील मराठी रंगभूमीवरील हे पहिले नाटक. मिलिंद जोशी यांचे प्रयोगशील संगीत व अत्यंत प्रभावी लेखन आणि दिग्दर्शन असलेले हे नाटक मराठीसह, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांमध्ये सदर करण्याचा आर्टिस्टिक ह्युमन्स नाट्यसंस्थेचा मानस आहे.

यापूर्वी ‘पृथ्वीचे शेतकरी’ या ‘संयुक्त राष्ट्राने’ गौरवलेल्या नाटकाची निर्मिती आर्टिस्टिक ह्युमन्स संस्थेने केलेली आहे. यंदा भारतीय संविधान लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली. त्याचेच औचित्य साधून राष्ट्रग्रंथची निर्मिती केली असून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत हे नाटक पोचवणार असल्याचा विश्वास नाटकाचे निर्माते दर्शन महाजन यांनी व्यक्त केला.

राष्ट्रग्रंथ नाटक

Leave a comment

Explore
Drag